बंगळुरूवरून पुण्यात दाखल झालेली बांग्लादेशी घुसखोर महिला पोलिसांच्या ताब्यात
रेल्वेने बंगळुरूवरून पुण्यात आलेल्या एका बांग्लादेशी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुसलामिया अब्दुल अजिज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, थाना आमतुली, जि. बोरगुना, बुलिशाखाली, बांगला देश) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लीस अंमलदार भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मुसलामिया ही मंगळवारी बंगळुरूवरून पुण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ६ च्या बाहेर रिक्षा स्टँडजवळ ती घुटमळत होती. तिला फक्त बंगाली भाषा बोलता येत होती. इतर भाषा तिला समजत नव्हती. रिक्षा स्टँडजवळ काही वेळ थांबल्यामुळे बंडगार्डन पोलिसांना तिच्या उपस्थितीची माहिती मिळाली. तत्काळ दामिनी पथकातील कर्मचारी तिथे पोहोचल्या. त्यांनी मुसलामियाची चौकशी केली. तिला बंडगार्डन पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
पोलिसांनी मुसलामियाकडे चौकशी केली असता पोलिसांना तिच्याबद्दल अधिक माहिती समजली. मुसलामिया बांगलादेशी नागरिक आहे. तिचे शिक्षण ८ वीपर्यंत झाले आहे. मंगळवारी बंगलोरहून ती रेल्वेने पुण्यात आली. ती बांग्लादेशातून कोलकत्ता येथे आली होती. कोलकत्त्यात तिला बनावट कागदपत्रे तयार करून दिली होती. त्यानंतर विमानाने तिने बंगलोर गाठले. परंतु अनेक दिवस तिला तिथे काम मिळाले नाही. पुण्यात काम मिळेल म्हणून तीने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रेल्वेने ती पुण्यात आली.
भारतामध्ये प्रवेश करण्यासंबंधी कोणतीही वैध कागदपत्रे नसताना, तसेच बांगलादेश-भारत सीमा ओलांडण्यास संबंधित स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता भारतात प्रवेश केल्यामुळे ती बांग्लादेशी घुसखोर असल्याची खात्री करून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुजावर तपास करत आहेत.