सिंहगड रोड परिसरातील चरवड वस्तीत पूर्ववैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलाचा खून
सिंहगड रोडवरील चरवड वस्तीत पूर्ववैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी १७ वर्षीय मुलाचा ‘येता जाता आमच्याकडे का पाहतो’ या कारणाने चॉपरने वार करून खून केला. काही दिवसांपूर्वीच वानवडी परिसरात पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
श्रीपाद अनंता बनकर (वय १७) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास सिंहगड रोड परिसरातील चरवड वस्ती येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपाद बनकर हा शिक्षण घेत होता. त्याच वस्तीतील काही मुलांसोबत त्याचे पूर्वी वाद झाले होते. एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून तीन अल्पवयीन मुलांनी रागाच्या भरात श्रीपादवर चॉपरने सपासप वार करून त्याचा खून केला. दरम्यान, सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी त्वरीत कारवाई करत गुन्हा दाखल केला असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.