कौतुकास्पद: वाहतुक महिला पोलीस कर्मचार्यांनी केली महिलेची प्रसुती
बाळंतपणासाठी रुग्णालायकडे जाताना अवडघलेल्या गर्भवतीची हिंजवडी वाहतूक शाखेच्या दोन महिला पोलिसांनी सुखरूप प्रसूती केली. या घटनेनंतर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाकड नाका येथे हा अविस्मरणीय प्रसंग घडला.
रविवारी राजश्री माधव वाघमारे (वय २५) यया गर्भवती महिलेला प्रसूती कळा जाणवू लागल्या होत्या. बाळंतपणासाठी त्या रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. पण वाकड नाका येथे अचानक त्यांची स्थिती गंभीर झाली. त्यांच्या वेदना पाहून तिथे वाहतूक नियमन करत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी नीलम विजय चव्हाण आणि रेश्मा नजीर शेख यांनी तत्काळ मदतीसाठी पुढे पाऊल टाकले. राजश्री यांची अवस्था पाहून त्यांनी तातडीने १०८ क्रमांकावर रुग्णवाहिका बोलावली. पण प्रसूती कधीही होईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांनी राजश्री यांना जवळच्या एका खोलीत नेले. अशा कठीण प्रसंगीही त्यांनी आपला धीर ढळू दिला नाही. दोघींनी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांच्याकडून सूचना घेऊन प्रसूतीची तयारी केली.
प्रसंग अवघड होता. पण या दोन महिला पोलिसांनी आपल्या कर्तव्याचा एक नवा आदर्श उभा केला. त्यांनी राजश्री यांची सुखरूप प्रसूती केली. एका गोंडस बाळाचा जन्म झाला आणि या घटनेने नीलम चव्हाण व रेश्मा शेख यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्या क्षणाला त्या केवळ पोलीस कर्मचारी नव्हत्या, तर त्या आईसाठी देवदूत ठरल्या.
यानंतर, रुग्णवाहिका येताच आई आणि बाळाला पुढील उपचारांसाठी औंध रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या दोन्ही महिला पोलिसांना आयुक्तालयात बोलावून पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या या धाडसी आणि संवेदनशील कृत्याचे कौतुक केले.