ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची २७ लाखांची फसवणूक

पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वाघोली येथील एका तरुणाची तब्बल २७ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काम करून चांगले पैसे मिळवण्याचे आश्वासन देत, चोरट्यांनी या तरुणाला फसवले.

केसनंद परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी, चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर संपर्क केला. त्याला ऑनलाइन काम करण्यासाठी त्याला आमिष दाखवले. प्रारंभिक कामामध्ये त्याला दिलेल्या परताव्याने तरुणाचा विश्वास जिंकला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन टास्कमध्ये गुंतवणूक करण्याची सूचना केली. त्यानुसार, तरुणाने चोरट्यांच्या बँक खात्यात एकुण २७ लाख ४६ हजार रुपये जमा केले. त्यानंतर मात्र त्याला कबूल केलेला परतावा मिळाला नाही. त्याने चोरट्यांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला. त्याचे मोबाईल नंबर बंद आढळले. आपली फसवणुक झाली असल्याचे समजल्यानंतर तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड तपास करत आहेत.

Leave a Reply

rushi