दुचाकीस्वार चालकासोबतच ‘पाठीमागे बसलेल्या’लाही हेल्मेट सक्ती

दुचाकी चालवणारा आणि पाठीमागे बसलेला (पिलीयन रायडर ) अशा दोघांनाही हेल्मेट सक्ती होणार आहे. दुचाकी चालक आणि पिलीयन रायडर असे दोघांनीही हेल्मेट न वापरल्यास त्यांच्यावर वेगवेगळी कारवाई करण्यात यावी अशा सूचना राज्याचे अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) अरविंद साळवे, भाप्रसे यांनी दिल्या आहेत.

मागील पाच वर्षांत दुचाकी चालवणारा आणि पिलीयन रायडर यांचे अपघात होवून मृत्युमुखी पडण्याचे आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोघांकडूनही हेल्मेट वापरले जात नाही. तसेच कायद्यातील तरतुदींनुसार पोलिसांकडूनही याबद्दल योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याचे निरक्षण अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी नोंदवले आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट आणि सुचनांची माहिती संबंधित सर्व पोलीस आधिकारी आणि अंमलदार यांना देण्यात यावी आणि मोटार वाहन कायद्याची कडक आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी चालवणारा आणि पाठीमागे बसलेला अशा दोघांनीही हेल्मेट वापरणे सक्तीचे होणार आहे.

त्यासाठी ई चलन मशीनमध्ये काही बदल केले जाणार आहे. दुचाकी चालवणारा – ड्राइव्हर आणि पाठीमागे बसलेला – पिलीयन अशा दोन वेगवेगळ्या शीर्षकांखाली आता कारवाई होणार आहे. त्यामुळे दुचाकीस्वार चालक आणि पिलीयन रायडर यांचे अपघात, मृत्युमुखी व जखमींची संख्या निश्चित होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

rushi