प्रेयसीने दिली खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; तरुणाची आत्महत्या
चाकण : प्रेयसी आणि योग प्रशिक्षकाने लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना चाकण येथील श्रीरामनगर येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७, रा. चाकण) असे आहे.
याप्रकरणी श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय २५) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, एक महिला आणि बापू सोनवणे या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत आणि आरोपी महिलेचे प्रेमसंबंध होते. आरोपी महिला आणि योगा प्रशिक्षक बापू सोनवणे यांनी सूर्यकांतला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच समाजमाध्यमांवर शिवीगाळ करत त्याचा अपमान केला.
या मानसिक त्रासाला कंटाळून सूर्यकांतने १८ ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.