चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका; आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : चारचाकी खासगी वाहनांसाठी लवकरच सुरु होणाऱ्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे.
मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. लिलावाचे डीडी २८ नोव्हेंबर रोजी दु. २.३० वा. पर्यंत स्वीकारले जातील, व प्राप्त अर्जांचा लिलाव दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात करण्यात येईल.
दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. एकाच क्रमांकाकरिता जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. लिलावाचे डीडी २९ नोव्हेंबर रोजी दु. २.३० वा. पर्यंत स्वीकारले जातील व प्राप्त अर्जांचा लिलाव दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात करण्यात येईल.
पसंती क्रमांकाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित मालिका ऑनलाईन सुरू करण्यात येणार आहे. पसंती क्रमांक आरक्षीत करण्याकरिता https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये यांनी कळविले आहे.