वरंधा घाटात इको कार 500 फूट दरीत कोसळली; एक ठार, आठ जखमी

महुडे : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी (ता. भोर) येथील वळणावर सोमवारी (ता. २७) पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. महाडकडून भोरकडे जाणारी इको कार (एमएच १२ युजे ९९५७) अंदाजे 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या महितीनुसार, या दुर्घटनेत शुभम शिर्के (वय २२, जनता वसाहत, पुणे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

तर मंगेश गुजर (वय २६, दत्तवाडी), अशोक गायकवाड (वय २९, भवानीपेठ), सिद्धार्थ गणधने (वय २६, दांडेकर पूल), सौरभ महादे (वय २२, पर्वती), गणेश लावंडे (वय २७, धायरी), अभिषेक रेळेकर (वय २५, नारायण पेठ), यशराज चंद्रलोकूल (वय २२, घोरपडे पेठ) आणि आकाश आडकर (वय २५, दत्तनगर) हे जखमी झाले आहेत.

भोर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ आणि सह्याद्री बचाव टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह आणि जखमींना तातडीने भोर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या बचावकार्यात भोर पोलिस ठाण्याचे हवालदार राहुल मखरे, सुनील चव्हाण, सागर झेंडे, तसेच वारवंडचे पोलिस पाटील सुधीर दिघे, ग्रामस्थ भाऊ उंब्राटकर, विठ्ठल पोळ, नीलेश उंब्राटकर, अक्षय धुमाळ आणि नीलेश पोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

rushi