पुण्यात क्रूरतेचा कळस! बायकोचा खून करून पतीने केलं व्हिडिओ शूटिंग, पोरासमोरच सांगितलं मारायचं कारण

पुणे : घरगुती वादातून स्वत:च्या मुलासमोरच पत्नीचा कात्रीने गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील खराडी भागात घडली. खून केल्यानंतर पतीनं तिच्या मृतदेहासोबत आपण खून का केला याची माहिती देणारा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

ज्योती शिवदास गिते असे या खून झालेल्या पत्नीचं नाव आहे. तर शिवदास गिते असं क्रूरकर्मा पतीचं नाव आहे. खराडी येथील राहत्या घरी बुधवारी पहाटे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणारा आहे. गिते कोर्टात स्टेनो म्हणून नोकरीस आहे. खराडी परिसरात तो भाड्याने राहत आहे. या पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडणं होत होती. शिवदासने घरातील कात्रीनं पत्नी ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. आपली प्रॉपर्टी पत्नी हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याला संशय होता. या व्हिडिओमध्ये बायको आपल्यासाठी लक्ष्मी होती. मात्र तिनं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं आपला जीव वाचवण्यासाठी आपण नाईलाजानं पत्नीचा खून करत आहोत, असं त्यानं शूट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे. दरम्यान, ज्योती गीतेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे देवून तिच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे.

खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

rushi