बारामती स्वतंत्र जिल्हा होणार? वाचा मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया
पुणे: बारामती हा स्वतंत्र जिल्हा होणार नसल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. बारामती जिल्हा होणार असल्याच्या अफवा असून, राज्यात नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी सांगितले. एका खाजगी कार्यक्रमासाठी बारामती विमानतळावर आले असता पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली.
मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू आहे, त्यात बारामतीचा स्वतंत्र जिल्हा म्हणून समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चर्चा निराधार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
बारामती विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, बारामतीसाठी स्वतंत्र जिल्ह्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. सध्या यासंबंधी सुरू असलेल्या चर्चा केवळ अफवा आहेत.
पालकमंत्री पदाच्या गोंधळाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, महायुती सरकारचा विस्तार मोठा आहे आणि यामध्ये कुठेही नाराजी नाही. महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन यावर तोडगा काढतील. पहिल्यांदाच महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल विचारले असता विखे पाटील म्हणाले, शिंदे नाराज नसून, ते नेहमीप्रमाणे गावी गेले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.