वाल्मिक कराड कनेक्शन, भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीकडून चौकशी

पुणे : बीड मधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर बीडसह महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलंय. या प्रकरणात सीआयडीने खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राज्यातील अनेक भागात वाल्मिक कराड याच्या कोट्यवधी रूपयाच्या जमिनी आणि शॉप खरेदी केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज समोरील एका इमारतीमध्ये ३ ऑफिस वाल्मिक कराड यांनी पत्नीच्या नावाने खरेदी केल्याचे समोर आले. हे शॉप खरेदी करण्यास पुण्यातीलच भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी मदत केल्याने सीआयडीकडून दत्ता खाडे यांना नोटीस बजविण्यात आली. त्या सर्व घडामोडी दरम्यान सोमवारी केज येथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीला दत्ता खाडे सामोरे गेले. सीआयडीकडून दोन तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांना काय प्रश्न विचारले गेले? याबाबत स्वतः खाडे यांनी माहिती दिली आहे.

खाडे म्हणाले, सीआयडीने माझी चौकशी केली. मी सीआयडीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. दहा वर्षात मी वाल्मीक कराडला फोनही केला नाही आमची भेटही झालेली नाही. वाल्मीक कराडचा फोन नंबर माझ्याकडे नाही. मी गोपीनाथ गडाला दर्शनासाठी जात असतो मात्र वाल्मीक कराडला मी भेटलो नाही. फर्ग्युसन महाविद्यालय रोडवरील वाल्मिक कराडच्या मालमत्ता खरेदीच्या व्यवहारात माझा काहीही संबंध नाही. मी आणि वाल्मीक कराड एकाच जातीचे असल्यानं मला यात ओढलं जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला बदनाम करण्याचा हा सर्व प्रयत्न असल्याचा आरोप खाडे यांनी केला आहे.

Leave a Reply

rushi