कारवाई करत असताना उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याला मोटारीने उडवले, गावठी दारूचा टेम्पो घेऊन चालक पसार
गावठी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत असताना उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार नगर रस्त्यावरील भावडी या गावात झाला. दुय्यम निरीक्षकाच्या गाडीला यावेळी धडक देण्यात आली. त्यावेळी कारवाई केलेला टेम्पो घेऊन आरोपी पसार झाला.
याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विशाल कदम यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कदम हे उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. नगर रस्ता परिसरातील भावडी या गावामध्ये ते कारवाईसाठी गेले होते. एका टेम्पो मधून गावठी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
कदम यांनी भावडी रस्त्यावर टेम्पो अडवला. यावेळी पाठीमागून आलेल्या एका मोटारीने दुचाकीस्वार कदम यांना धडक दिली. कदम रस्त्यावर पडले. यावेळी कारवाई करण्यात आलेला टेम्पो घेऊन चालक तिथून पसार झाला. अंधाराचा फायदा घेऊन मोटार चालक देखील पळून गेला.
पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार पुढील तपास करत आहे.