पुणे : मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक; १५ लाखांचे एमडी जप्त
मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण १५ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ७७ ग्रॅम मेफेड्रॉनचा देखील समावेश आहे.
हुसेन नुर खान (वय २१, कोंढवा, पुणे) आणि फैजान अयाज शेख (वय २२, रा. भागोदय नगर, कोंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विशाल दळवी यांना लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीममधील एम.जी रोड कोळसा गल्ली मध्ये येथे लॉक मेकर्स दुकानाजवळ दोन संशयीत व्यक्ती असल्याची माहिती मिळाली.
लागलीच पोलिसांनी त्या ठिकाणी जावून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी आपली नावे हुसेन नुर खान आणि फैजान अयाज शेख असल्याचे सांगितले. दोघांनी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जवळ बाळगला होता. दोघांच्या विरुध्द लष्कर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांनी केली.