पोटच्या मुलीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईला जन्मठेपेची शिक्षा

पतीशी सुरू असलेल्या वादातून एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वारजे परिसरात घडली होती. पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या या आईला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी जन्मठेप तसेच १० हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.

अनिता संजय साळवे (वय २५, रा. वारजे) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे.

सविस्तर घटना अशी की, ४ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपी अनिता हिचा पती कामावर गेला होता. अनिता हिचे पतीशी भांडण झाले होते. तिने आपल्या मुलीचे शालीने तोंड दाबून खून केला. त्यानंतर पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वारजे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तिला अटक करून न्यायालयात तिच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या खटल्यात न्यायालयामध्ये सरकारी पक्षाकडून एकूण २० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. कुटुंबात भांडण सुरू होते. पतीने बोलणे टाकले होते. सासू दुर्लक्ष करत होती. माझ्या मागे मुलीची जबाबदारी सांभाळणारे कोणी नव्हते. तिची फरफट होवू नये म्हणून तिचा खून केला. आणि त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली अनिताने दिली होती.

कौटुंबिक वाद आणि नैराश्यातून आरोपी अनिता हिने मुलीचा खून केला तसेच आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे निष्पाप बालकाला जीव गमावावा लागला. आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. तर छळ आणि नैराश्यातून आईने मुलीचा खून केला असून ही घटना दुर्मीळ आहे. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. तिला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Leave a Reply

rushi