महर्षीनगर परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले, स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : महर्षीनगर भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पकडून स्वारगेट पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त केले असून त्याने ही बनावट कागदपत्रे कशी तयार केली याचा तपास सुरू करण्यात आला आहे. बांगलादेशी नागरिक मागील दहा वर्षांपासून पुण्यात बेकायदा वास्तव्यास असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एहसान हाफिज शेख (वय ३४, सध्या रा. अरुणा असिफ अली उद्यानाजवळ, महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) असे अटक घुसखोराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा कलम १४, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश, तसेच बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. २०१४ मध्ये त्याने भारतात घुसखोरी केली होती. त्यांतर पुण्यात येवून याने कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महर्षीनगर परिसरात सापळा लावून शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळवली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. यासोबतच तो पुण्यात कसा आला? त्याला कोणी पुण्यात आणले? महर्षीनगरमध्ये त्याला कोणी घर बघून दिले? आर्थिक मदत कोणी केली? त्याने आणखी कोणाकोणाला भारतात आणले आहे याची देखील चौकशी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.