येनपूरे टोळीच्या म्होरक्या पप्पू येनपूरेला बारामतीमधून अटक, पोलिसांना चकवत दोन वर्षे होता फरार
पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांनी येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीमधून अटक केली आहे. प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपूरे (वय ३०, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर येनपूरे तब्बल दोन वर्षे पोलिसांना चकवा देत फरार होता.
कात्रज आणि आंबेगाव भागात या टोळीने मोठ्या प्रमाणावर दहशत माजवली होती. येनपूरे याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाने अखेर त्याचा माग काढून अटक केली आहे.
दोन वर्षांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर येनपूरे पसार झाला. पोलीस सतत त्याच्या मागावर होते. मात्र तो मोबाइलचा वापर न करता आणि आपले राहण्याचे ठिकाण वारंवार बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे त्याचा शोध लावणे कठीण बनले होते.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी मंगेश पवार, महेश बारावकर, सचिन गाडे आणि अभिनय चौधरी यांच्या पथकाने अखेर त्याच्याबाबत माहिती गोळा केली. तपासादरम्यान येनपूरे बारामतीतील नीरा वागस परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन चोरमोले, सागर बोरगे, चेतन गोरे यांनी ही कारवाई केली.