‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; लोणावळा येथून घेतलं ताब्यात

पुणे : ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला वारजे माळवाडी पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली.

अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीय आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपी येळवंडे याच्याविरूद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली होती. कारवाईनंतर त्याला नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. कारवाईची माहिती मिळाल्यानंतर आरोपी येळवंड पसार झाला होता. गुन्हे शाखा, तसेच वारजे माळवाडी पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तो राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक संजय नरळे आणि तपास पथक येळवंडेच्या मागावर होते. तो लोणावळ्यात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाउसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, साळुंखे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, प्रशांत चव्हाण, रियाज शेख, विजय खिलारी, किरण तळेकर यांनी ही कामगिरी केली.

Leave a Reply

rushi