पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालच्या मैदानावर तिसऱ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन

पुणे: राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित तिसरे मराठी विश्व साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी माहिती दिली. संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची या संमेलनाला उपस्थिती राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच विश्व मराठी साहित्य संमेलन आहे. यापूर्वीची दोन संमेलने अनुक्रमे मुंबई आणि नवी मुंबई येथे झाली होती.

सामंत यांनी सांगितले की, मराठी साहित्यात जागतिक स्तरावर योगदान देणारे साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आणि मराठीतून अभिनय कारकीर्द सुरू करणारे अभिनेता रितेश देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. परदेशातील मराठी साहित्यिकांना देखील या संमेलनात आमंत्रित करण्यात येणार असून, त्यांच्या प्रवासाचा खर्च शासन उचलणार आहे.

संमेलनात मराठीतील ज्येष्ठ आणि नवोदित लेखक, कवी यांचा सन्मान होईल तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. बालसाहित्यिकांपासून लोकसाहित्यिकांपर्यंत सर्वांना या साहित्य महोत्सवाचा भाग होण्याची संधी मिळणार आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही परदेशातील मराठी साहित्यिक आणि व्यक्तींना या संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. “ते जरी परदेशात राहत असले तरी त्यांची ओळख महाराष्ट्राशी जोडलेली आहे,” असे सामंत म्हणाले.

पुण्यात होणाऱ्या या साहित्य संमेलनाला मराठी साहित्यविश्वात विशेष महत्त्व असून, मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

rushi