एचएमपीव्हीची (HMPV) भारतात एंट्री; संक्रमण टाळण्यासाठी ‘या’ सूचनांचे करा पालन
चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला होता. कोरोनानंतर जग पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर असल्याची चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाने संपूर्ण जगालाच वेठीस धरले होते. त्यानंतर आता चीनमध्ये एका नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस (HMPV)ची अनेक लोकांना लागण झाली आहे. या व्हायरसने इतर देशातही आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतात देखील या व्हायरसचे पेशंट्स आढळले आहेत.
ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे सर्दीचा त्रास सुरू होतो. हा एक हंगामी रोग आहे, जो रेस्पिरेटरी सिंकिटल व्हायरस आणि फ्लूसारखा हिवाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. एचएमपीव्ही हा नवीन सापडलेला विषाणू नाही. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने सांगितले की, २००१ मध्ये पहिल्यांदा ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस संक्रमित रुग्ण आढळून आला होता. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अॅडव्हायजरी जारी करण्यात आल्या आहेत.
या व्हायरसची लागण होवू नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. संसर्ग रोखण्यासाठी काही गोष्टी प्रकर्षाने कराव्या किंवा टाळाव्या लागतील.
हे करा –
१) जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रूमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
२) साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
३) ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
४) भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
५) संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नये –
१) हस्तांदोलन करू नका.
२) टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका.
३) आजारी लोकांशी जवळचा संपर्क ठेवू नका.
४) डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
५) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
६) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नका.