दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ

एका दुचाकीस्वार महिलेने महिला पोलीसाला धक्काबुकी करत शिवीगाळ केल्याची घटना शहरातील वारजे परिसरात घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याप्रकरणी वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वारजे परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलीस शिपाई ऋतुजा तांबे या दोन दिवसांपूर्वी वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी एका दुचाकीस्वार महिलेने वाहतुकीच्या नियमांचा भंग केला. ती दुचाकीस्वार महिला विरुद्ध दिशेने जात होती. यावर पोलीस शिपाई तांबे यांनी त्या महिलेले अडवले. तांबे या दुचाकीस्वार महिलेवर कारवाई करत होत्या. त्यावेळी त्या महिलेने तांबे यांना शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की देखील केली.

तांबे यांनी झाल्या प्रकारची माहिती त्यांच्या सहकारी पोलीस शिपाई चव्हाण यांना माहिती दिली. पोलीस शिपाई चव्हाण या तत्काळ घटनास्थळावर आल्या. त्यानंतर दुचाकीस्वार महिलेने तांबे आणि चव्हाण यांना शिवीगाळ केली. त्या महिलेने पुन्हा धक्काबुक्की केली. ती दुचाकीस्वार महिला झटापट करुन त्या ठिकाणावरून पसार झाली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

rushi