शिरूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीत 84.34 लाख रुपयांना गंडा

शिरूर – शिरूर शहरातील एका नोकरदाराला ऑनलाइन फसवणुकीत 84.34 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने वेगवेगळी कारणे देत व आरबीआय खात्याशी लिंक करण्याच्या नावाखाली या व्यक्तीचे पैसे विविध खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश विनायक धामणकर (वय 43, रा. बागवान नगर, शिरूर, मूळ रा. चिंचाळा एमआयडीसी, जि. चंद्रपूर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्याचे कारण सांगून त्यांच्या आयडीबीआय बँक खात्यातून विविध खात्यांवर पैसे ट्रान्सफर करून घेतले. सुरुवातीला AMAN KUMAR या आयडीवर 20 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर MANPURIA AGRO P या आयडीवर 11.70 लाख रुपये पाठवले.

त्यानंतर, म्युच्युअल फंड व शेअर बाजारातील गुंतवणुकीचे पैसे काढण्यास सांगून, ICICI बँकेतून 39.84 लाख रुपये घेऊन विविध खात्यांवर पैसे पाठवले. अपेक्षा हॉस्पिटल या आयडीवर 20 लाख, LLTAJ Rali या आयडीवर 6.84 लाख, MAHENDRA BISHNO या खात्यावर 10 लाख, तसेच DHIRENDRA/YESB0000263 या आयडीवर 3 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.

फसवणूक करणाऱ्यांनी यानंतर शेवटच्या व्हेरिफिकेशनसाठी पर्सनल लोन घेण्यास भाग पाडले. ICICI बँकेने 12 लाखांचे लोन मंजूर केले, त्यातील 11.80 लाख रुपये PANGYA digit या आयडीवर ट्रान्सफर करण्यात आले, तसेच उर्वरित 1 लाख रुपयेही घेतले.

या प्रकाराने एकूण 84.34 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रकाश धामणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

rushi