एटीएम केंद्रात मदतीच्या बहाण्याने महिलेच्या खात्यातून ८० हजार चोरले
पुणे : शिवाजीनगर परिसरातील एका एटीएममधून पैसे काढणाऱ्या महिलेला मदत करण्याचा बहाणा करून महिलेच्या खत्यातून ८० हजाराची रोकड चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही महिला दौंड येथे राहण्यास आहे.
मिळालेल्या महितीनुसार, दौंड येथे राहण्यास असलेली संबंधित महिला काही कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. शिवाजीनगर भागातील वीर चापेकर चौकात एका एटीएममधून त्या पैसे काढण्यास गेल्या. त्यावेळी चोरटा एटीएम केंद्रात शिरला. त्याने महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने महिलेकडून एटीएम कार्ड आणि पासवर्ड घेतले. मात्र महिलेच्या कार्डद्वारे मशीनमधून पैसे निघत नसून काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे त्याने सांगितले. त्याने आपल्याकडील एटीएम कार्ड महिलेला दिले. त्यानंतर महिला एटीएम केंद्रातून बाहेर पडली.
चोरट्याने महिलेचे कार्ड चोरले होते. या कार्ड वापरुन त्याने ८० हजारची चोरी केली. आपल्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्याचे समजताच महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करत आहेत.