विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, ३८ लाखांना घातला गंडा

विवाहाच्या आमिषाने एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच आपण उच्च पदावरील अधिकारी असल्याची बतावणी करत या महिलेची सुमारे ३८ लाख रुपयांची फसवणूक देखील करण्यात आली. बलात्कार तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका ३७ वर्षीय महिलेने या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात या महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर तिची नोंदणी केली होती. त्यानंतर आरोपीने या महिलेशी संपर्क साधला. आपण विवाहास इच्छुक असल्याचे त्याने महिलेला सांगितले. आरोपीने महिलेची भेट घेतली. आपण उच्च पदावरील अधिकारी असल्याचे त्याने महिलेला सांगितले. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून महिलेवर बलात्कार केला. तसेच जमीन खरेदी करायची असल्याचे सांगून या आरोपीने महिलेकडून ३८ लाख रुपये देखील घेतले होते. महिलेने त्याला लग्नाबाबत विचारले तेव्हा त्याने त्याबाबत टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

rushi