रविवार पेठेतील बंदुकीच्या दुकानातून २० काडतुसे, ३२ बोअरची चोरी, दोघे अटकेत
पुणे : रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये असलेल्या एका परवानाधारक बंदूक विक्रीच्या दुकानातून ३२ बोअर आणि पिस्तुलाची २० काडतुसे चोरीला जाण्याची घटना घडली. या प्रकरणी याच दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना अटक करण्यात आली आहे. अदित्य चंदन मॅकनोर (वय २२) आणि सुमित राजू कांबळे (वय २८, दोघेही रा. कॅम्प, पुणे) यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अज्ञान फिरोज बंदूकवाला (रा. बोहरी आळी, रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी ही कामगिरी केली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदार बंदूकवाला यांचे रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये परवानाधारक पिस्तूल आणि बंदूक विक्रीचे दुकान आहे. येथे पिस्तुलांसाठी काडतुसे आणि बंदुकांसाठी लागणार्या बोअरची विक्री होते. याच दुकानात काम करणाऱ्या अदित्य मॅकनोरने जलद पैसे कमविण्याच्या उद्देशाने ३२ बोअर आणि २० काडतुसे चोरी केली. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बंदूकवाला यांनी पोलिसांत तक्रार केली.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिस अमंलदार अमोल सरडे यांना अदित्य आणि त्याचा मित्र सुमित कांबळे चोरी केलेली काडतुसे विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी कॅम्प परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अटकेदरम्यान चोरी केलेली ३२ बोअर आणि २० काडतुसे जप्त करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.