वनराज आंदेकर खून प्रकरणी २१ आरोपींविरुद्ध १७०० पानी आरोपपत्र दाखल

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर यांच्या खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २१ आरोपींविरुद्ध १७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात शुक्रवारी हे आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध स्वतंत्रपणे बाल न्याय मंडळात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठ येथे झालेल्या या हत्येचा संबंध टोळीयुद्ध आणि संपत्तीच्या वादाशी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गुंड सोमनाथ गायकवाड, आंदेकर यांची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश आणि प्रकाश कोमकर यांच्यासह २१ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आरोपींनी एकत्र येऊन कट रचल्याचे उघड झाले आहे. खुनासाठी अभिषेक खोंड, आकाश म्हस्के आणि संगम वाघमारे यांनी मध्य प्रदेशातून पिस्तुले व काडतुसे आणल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, काही आरोपी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना तेथून अटक केली.

आरोपपत्रात ३९ साक्षीदारांचे जबाब, आरोपींच्या संभाषणांचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून आठ पिस्तुले, सात काडतुसे, सात कोयते, तीन मोटारी आणि सात दुचाकी जप्त केल्या आहेत. तपास अधिक सखोल करण्यासाठी गुन्हे शाखेने तीन वेळा मुदतवाढ घेतली होती.

वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणामागे आर्थिक व कौटुंबिक वाद, तसेच एका वर्षापूर्वी घडलेल्या निखिल आखाडे हत्येचा बदला घेण्याचा कट असल्याचे निष्पन्न झाले आहे. आंदेकर यांच्या बहिणीचे नाना पेठ येथे दुकान होते. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान हे दुकान हटवले गेले. ही कारवाई आंदेकर यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप संजीवनीने केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या संजीवनी आणि तिच्या कुटुंबीयांनी गुंड सोमनाथ गायकवाड याच्या मदतीने हा कट रचला.

याशिवाय, २०२३ मध्ये नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीतील गुंडांनी सोमनाथ गायकवाडचा साथीदार निखील आखाडे याचा खून केला होता. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी आंदेकर यांची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

rushi