लोकअदालतमध्ये वीज चोरीची १२२ व दाखलपूर्व ४ हजार तडजोडयुक्त प्रकरणे दाखल
पुणे : जिल्ह्यात शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वीज चोरीची १२२ तर ‘महावितरण अभय योजना-२०२४’ अंतर्गत दाखलपुर्व ४ हजाराहून अधिक तडजोडयुक्त प्रकरणे निवडण्यात आली आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी दिली.
पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वीज चोरी आणि थकबाकीची पुणे शहर आणि जिल्ह्यातून दाखल प्रकरणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये ग्राहकांना तडजोडीच्या माध्यमातून विविध सवलती मिळणार आहे. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.
वीज कायदा कलम १३५ आणि १३८ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा या लोक अदालतमधे प्रामुख्याने समावेश केला आहे. वीज चोरी प्रकरणात कोटांत दोषरोपपत्र दाखल नसेल तर लोकअदालतमध्ये ग्राहक दाखलपूर्व प्रकणात तडजोड करु शकतात. वीज चोरी प्रकरणात लोकअदालतमध्ये तडजोड केल्यास ग्राहकास वीज बिलात १० ते १५ टक्के सवलत मिळू शकते.
महावितरण अभय योजना-२०२४
कायमस्वरुपी वीज पुरवठा बंद करण्यात आलेल्या ग्राहकासाठी महावितरणने २९ ऑगस्ट, २०२४ पासून ‘महावितरण अभय योजना २०२४’ सुरू केली आहे. यामध्ये बिलाची संपूर्ण थकबाकी भरल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ केला जातो. तसेच ग्राहकास थकबाकी एकरकमी भरण्याचा किंवा ३० टक्के डाऊन पेमेंटसह जास्तीत जास्त सहा हप्त्यात भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय उच्चदाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास ५ टक्के, तर लघुदाब ग्राहकास १० टक्के अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. यानंतर ग्राहकास आहे त्याच जागेवर किंवा अन्यत्र पुन्हा वीज पुरवठा कनेक्शन दिले जाईल.
वीज चोरीत फौजदारी आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित प्रकरणात जास्तीत जास्त ग्राहकांनी लोकअदालतच्या माध्यमातून तडजोड करून मुक्त व्हावे असे आवाहन सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.