10th Ajanta-Ellora International Film Festival : यंदाच्या AIFF मध्ये जागतिक सिनेमे का व कोणते पाहावे?
दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारीदरम्यान प्रोझोन मॉल पीव्हीआर-आयनॉक्स छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
—
गेल्या दहा वर्षांपासून मराठवाड्यातील सिनेरसिक नववर्षाची सुरुवात दर्जेदार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमे पाहून करतात. यंदाचे वर्षदेखील त्याला अपवाद नाही. वर्षागणिक अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिकाधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. यंदाच्या महोत्सवात दाखविली जाणाऱ्या चित्रपटांची नावे पाहिली तर याची खात्री पटते.
प्रतिष्ठित कॅन, बर्लिन, व्हेनिस, टोरोंटो चित्रपट महोत्सवात गाजलेले चित्रपट ते जगभरातील प्रादेशिक सिनेमे आणि माहितीपट 15 ते 19 जानेवारीदरम्यान प्रोझोन मॉल येथील पीव्हीआर-आयनॉक्स थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहेत.
सिनेरसिक तर आवर्जून हजेरी लावतातच; परंतु महोत्सवाच्या दशकपूर्तीनिमित्त ‘काठावर’च्या प्रेक्षकांनीसुद्धा यंदा चित्रकुंभमेळाव्यात डुबकी मारून पाहावी. या काठावरच्या प्रेक्षकांकडून विचारणा होत असते की, त्यांना महोत्सवात यायचे असते पण भाषेची अडचण वाटते.
ऑस्कर विजेता कोरीयन दिग्दर्शक बोंग जून-होच्या (पॅरासाईट) शब्दात सांगायचे तर, एकदा का तुम्ही सबटायटल्सचा एक इंच उंच अडथळा पार केला की, तुमच्यासाठी जगभरातील अनन्यासाधारण चित्रपटांचे अवकाश खुले होते. काय मिळते या अवकाशातून?
समृद्ध कलेचा अनुभव
जागतिक सिनेमे वेगवेगळ्या देशांची संस्कृती, जीवनशैली आणि परंपरा समजून घेण्याची एक उत्तम संधी प्रदान करतात. त्या त्या देशांच्या इतिहास, दैनंदिन संघर्ष, आणि सध्याच्या सामाजिक मुद्यांचे अवलोकन होते. आपल्या नेहमीच्या चित्रपटांहून भिन्न विविध प्रकारच्या कथा, दृश्यशैली, आणि फिल्ममेकिंग तंत्रांचा वापर पाहून समृद्ध कलेचा अनुभव घेता येतो. यातून विचारशक्ती वृद्धिंगत होऊन जीवनाविषयी, कलेविषयी नवा दृष्टिकोन मिळतो. नवोदित सिनेत्सुक तरुणांना वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शन, अभिनय, कॅमेरा वर्क, संपादन आणि संगीत याबद्दल नवीन गोष्टी शिकता येतात. तसेच, सोशल मीडियावरचे छोटे व्हिडिओ पाहून लक्ष केंद्रित करण्याची आपली क्षीण होत असलेली क्षमता यानिमित्ताने कदाचित थोडी बळकट होऊ शकते.
60+ चित्रपट पाहण्याची संधी
महोत्सवात भारतीय चित्रपटांच्या मुख्य स्पर्धेव्यतिरिक्त फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, इंग्लंड, बेल्जियम, नेदरलँड, बल्गेरिया, कॅनडा, फिनलँड, इराण, चीन, तिबेट, नेपाळ अशा वेगवेगळ्या देशांतील 60 पेक्षा जास्त चित्रपट दाखविले जाणार आहेत. यातील काही निवडक सिनेमांची माहिती घेऊ.
व्हिलेज रॉकस्टार्स 2 (आसामी)
भारताकडून 2018 साली ऑस्करला पाठविण्यात आलेल्या रिमा दास दिग्दर्शित ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ सिनेमाचा दुसरा भाग यावेळी मुख्य स्पर्धेत आहे. पहिल्या चित्रपटात बालवयातील धुनूचे रॉकस्टार होण्याचे स्वप्न तिच्या कुमारवयात कोणकोणत्या आव्हानांना तोंड देत साकारू लागते, याची कहाणी या भागात पाहायला मिळणार आहे.
अंगम्मल (तमिळ)
प्रसिद्ध लेखक पेरुमल मुरुगन यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात आई-मुलाच्या नात्यातून आधुनिक विरुद्ध पारंपरिक जीवनपद्धतीची मीमांसा केलेली आहे. शहरात स्थायिक झालेल्या डॉक्टर मुलगा गावात राहणाऱ्या आपल्या आईला साडीवर ब्लाऊज घालण्यास आग्रह करण्यावरून उद्धभवलेला संघर्ष दिग्दर्शक विपिन राधाकृष्णन यांनी दाखविला आहे.
द सीड ऑफ द सेक्रेड फिग (इराण)
इराणमधील सरकारविरोधी आंदोलकांना जाचक तुरुंगवास आणि अनेकप्रसंगी फाशीची शिक्षा देण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायाधीशाची ही कथा. खुद्द सिनेमाचे दिग्दर्शक मोहम्मद रसौलोफ यांना इराणच्या कट्टरपंथी सरकारवर टीका केल्यामुळे आठ वर्षांची शिक्षा झालेली आहे. गेल्यावर्षी जीव वाचवून त्यांनी इराणमधून पलायन करून हा चित्रपटा पूर्ण केला.
द रूम नेक्स्ट डोअर (इंग्लिश)
जगप्रसिद्ध स्पॅनिश दिग्दर्शक पेद्रो अल्मोदोव्हर यांची ही पहिलीच इंग्रजी फिल्म. दोन मैत्रिणींच्या या कथेत एक जण कर्करोगानेग्रस्त असल्यामुळे मृत्यू कवटाळू पाहतेय तर दुसरी तिला शेवटच्या टप्प्यात सहकार्य करतेय. टिल्डा स्विंटन आणि जुलियन मूर अभिनीत या फिल्मला व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन लायन’ पुरस्कार मिळालेला आहे.
शंभाला (नेपाळ)
हरवलेल्या नवऱ्याला डोंगरदऱ्यांमध्ये अतिशय खडतर परिस्थिती शोधणाऱ्या गर्भवती पत्नीची ही साहसी कथा. दिग्दर्शक मिन बहादूर बाम यांनी एका जिद्दी महिलेच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक संघर्षाची जडणघडण दाखवली आहे. नेपाळमधील सर्वात महागड्या बजेटने तयार झालेला हा चित्रपट तेथून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.
द गर्ल विथ द नीडल (डेन्मार्क)
डेन्मार्कची ऑस्कर एंट्री आणि गोल्डन ग्लोब नामांकित ही हॉरर फिल्म 2024 मधील सर्वोत्तमपैकी एक मानली जात आहे. गोरगरीब कुटुंबातील नवजात बाळांना बेकायदेशीर दत्तक देणाऱ्या वृद्ध महिलेच्या सेवेसाठी नर्स म्हणून आलेल्या गर्भवती तरुणीला अत्यंत भयंकर वास्तवाचा कसा सामना करावा लागतो याची भयावह गोष्ट दिग्दर्शक मॅग्नस वॉन हॉर्न याने मांडली आहे.
फ्रेंच क्लासिक्सची मेजवानी
जागतिक सिनेमामध्ये नवचैतन्य भरणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये फ्रॉन्स्वा त्रुफोचे नाव अग्रणी घेतले जाते. अशा या महान फ्रेंच दिग्दर्शकाची ‘जूल्स अँड जीम’ (1963) ही नावाजलेली कलाकृती आणि ‘फ्रेंच न्यू वेव्ह’चा शिलेदार एरिक रोहमरची ‘अ समर्स टेल’ (1996) फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच प्रयोगशील फिल्ममेकर ख्रिस मार्करच्या ‘ला’जती’ (1962) आणि ‘सनलेस’ (1983) या प्रायोगिक माहितीपटांचीही मेजवानी मिळणार आहे. पैकी ‘ला’जती’मध्ये टाईम ट्रॅव्हलची कथा केवळ स्थिर छायाचित्रांच्या माध्यमातून सांगितलेली आहे.
मान्यवरांना मानवंदना
राजकपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सिद्धार्थ काक दिग्दर्शित ‘राज कपूर’ (1987) हा माहितीपट दाखविला जाणार आहे. तसेच प्र. के. अत्रेंचा ‘श्यामची आई’ (1953) आणि नुकतेच निधन पावलेले श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ (1984) चित्रपटसुद्धा पाहण्याची संधी मिळणार आहे. पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी सई परांजपे दिग्दर्शित व झाकीर हुसैन अभिनीत साझ (1998) चित्रपटाचेही प्रदर्शन होणार आहे. तसेच भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला ‘कालिया मर्दन’ (1919) मूकपट लाईव्ह ऑर्केस्ट्रासह पाहता येणार आहे.
फेस्टिवल तिकिट बुकिंग
चार दिवसीय महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी फेस्टवलच्या अधिकृत संकेतस्थळावर (my.aifilmfest.in) किंवा बूक माय शो (bookmyshow.com) अॅपवर करू शकता. अधिक माहितीसाठी 8668591341 क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.